Jitendra's 2020 Hero

तो अजून उभा आहे.... जमीन मोजणी नंतर झालेला फाळणीबारा आणि ऑनलाईन सातबारा हे तत्कालीन सरकारने घेतलेले क्रांतीकारी निर्णय. त्याची अंमलबजावणी करताना अधिका-यांनी केलेल्या चुकीच्या नोंदीची झळ अनेकांना पोहचली. गरीब शेतक-यांना आपल्या जमिनीवरचा हक्क सिध्द करण्यासाठी पैसा, वेळ आणि श्रम पणाला लावावे लागत आहेत. अधिका-यांनी केलेल्या चुकांची शिक्षा शेतक-याला का? असा प्रश्न घेवून शिदू शेजवळ आपल्याला भेटतात. वयाने साठी ओलांडली तरी त्याच्या नशिबी निवृत्ती नाही. मनेरुग्ण पत्नी आणि कमी उत्पन्न देणारी शेती यांच्यावर तो जीवापाड प्रेम करतो. भले त्याची दोन्ही मुले शहरात असली तरी त्याला आपल्या जमिनीतच शेवटचा श्वास घ्यायचा आहे. खरे पाहिले तर हा मावळातला एक सर्वसामान्य शेतकरी आहे. हीरो म्हणावे असे त्याच्याकडे काय आहे? नेहरु शर्ट, पायजमा, डोक्यावर टोपी, एका हातात छत्री, दुस-या हातात जमिनीच्या कागदपत्रांची पिशवी असा त्याचा अवतार. कधी शेतीत, एखाद्या वाडी वस्तीवर तर कधी सरकारी कार्यालयात तो दिसतो. त्याचा लढा सुरु आहे विविध प्रश्नांशी. सकारात्मकतेने कातळाला पाझर फोडायला निघालेल्या या बळीराजास मानाचा मुजरा.